-------देवा माझे ~~ नि ~~ शब्दांचे नाते अतूट राहू दे --------
"तुझ्यातूनी सुरूवात तुझ्यापाशी अंत माझ्यातूनी तुही
तसा शोधसी एकांत माझ्या
तळहाती तुझे शाश्वत
गोंदण तुझ्या वाटेवर माझी आनंद पेरण..…। काल
सांज वेळी अशीच खिडकीबाहेर पाहता पाहता , सहजच विचार करता
करता पाच वर्षांपूर्वी लिहीलेली एक कविता आठवली. मला खूप आवडते ती कविता. नेमकी
त्यातली एक ओळ बराच वेळ आठवत नव्हती. आठवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही केल्या
आठवेनाच. मग वाटले जाऊ दे कुठे इतका ताण देऊ …जाऊ दे आठवेल
नंतर …. पण मन कुठे थाऱ्यावर …खुप
अस्वस्थ झाले आठवत का नाही .
शेवटी आठवली. खूप हलकं वाटलं. क्षणभरापूर्वी आपण किती
अस्वस्थ झालो होतो हा विचार लगेचच मनात आला. कवितेतली ती ओळ आठवल्यावर आनंद नक्कीच
झाला होता. पण तो आनंद नेहमीपेक्षा खूप वेगळा होता. खूप जवळचे मित्रमैत्रिणी भेटले
की जसा आनंद होतो ना तसाच काहीसा. पण त्या मित्रमैत्रिणींपेक्षाही जवळचं.. मनाच्या
गाभ्याशी असलेलं काहीतरी परत मिळाल्याचा आनंद होता तो. अव्यक्त! त्या क्षणी जे
वाटलं ते खरंच व्यक्त करता आलं नाही मला. एरव्ही शब्दांच्या दुनियेत रमणारं हे मन
शब्दांमुळे मिळणारा हा आनंद शब्दांतून व्यक्त करू शकलं नाही. शब्द... शब्दांशी
माझी नाळ लहानपणीच जोडली गेलेली. स्वतः हातात घेऊन वाचलेलं पहिलं पुस्तक.. चंपक!
चंपकने मला शब्दांशी मैत्री करायला शिकवलं. त्या नकळत्या वयातही गोष्टींमधल्या
मूल्यांचा संस्कार माझ्या मनावर घडवला. पंचतंत्र, हितोपदेश,
परीकथा, सुरस गोष्टी.. खूप आवडायला लागली
पुस्तकं. पुढे ललितलेख, कथा, कादंबऱ्या,
चरित्र, आत्मचरित्र, निसर्गवर्णनं,
काव्यसंग्रह, मासिकं, नियतकालिकं,
दिवाळी अंक असं बरंच काही वाचायला लागले. पु. लं., वपुंच्या अनेक पुस्तकांची पारायणं केली. शांता शेळके, गदिमा, भट साहेब, पाडगावकर वाचून आतला जिप्सी जागा होत गेला. भट साहेबांनी शृंगाराचा अर्थ खऱ्या अर्थाने उलगडला. ह्या शब्दांनी लहान वयातच हात लिहिता केला. शब्दांची अर्थाशी.. अर्थाची विचारांशी आणि विचारांची जगण्याशी सांगड घालण्याला सुरुवात झाली तीही नकळतच.. कोऱ्या कागदावर कसलीतरी जादू झाल्यागत शब्द उमटवून घेणारा तो परमेश्वर! त्या शब्दांशी केवढे जोडले गेलोय आपण..! आयुष्यात पुढे जाऊन अगदी
कशाचीही उणीव भासली तरी ही पुंजी मात्र वाढतच राहणार.. शब्दांचं आणि माझं हे नातं असंच घट्ट होत राहणार.. लहानपणीचा 'चॉकलेटचा बंगला' आठवला. केवढी सुबत्ता होती त्या बंगल्यात! तशीच काहीशी सुबत्ता माझ्यापाशीही वाढत जाणार.. शब्दांची.. अर्थाची.. विचारांची! कधीच कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही अशी.. परमेश्वराने बहाल केलेल्या ह्या अव्यक्ताच्या लेण्यासाठी मनोमन आभार मानले त्याचे. शब्दांचा हा संग कधीच सोडायचा नाही असा निर्धार केला आणि पाहते तर........ सांज वात लावण्याची योग्य वेळ झाली होती ……………….
देवा माझे नि
शब्दाचे हे नाते असेच अतूट राहू दे…….
सई (सौ. संतोषी केदार
कदम )
No comments:
Post a Comment