' ती '
प्रा. मनीषा जी जैन - बांदे
मुंबई ......
ती
ती तशी साधीच परंतू चारचौघींसारखी मात्र निश्चितच नाही.
उच्चशिक्षित, प्रगल्भ, विचारी, संवेदनशील, हळवी, बाणेदार इ. बरेच काही गुण असलेली...
ती तशी साधीच परंतू चारचौघींसारखी मात्र निश्चितच नाही.
उच्चशिक्षित, प्रगल्भ, विचारी, संवेदनशील, हळवी, बाणेदार इ. बरेच काही गुण असलेली...
लग्न होऊन एका सामान्य वकूब असलेल्या त्याच्या गळ्यात पडलेली...
लग्नानंतर लगेच दिवस राहिल्याने करीयरवर पाणी सोडावं लागणारी...
तो दिवस भर कामासाठी बाहेर...
ही दिवसभर घरकाम व मुल यांच्यातच बुडालेली...
व
ती वाचनाची प्रचंड आवड...
वक्तृत्वात हातखंडा असलेली...
मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृतमध्ये तरबेज...
तो धड मराठीही न वाचता येणारा...
घरातच राहून हळूहळू तिच्यातली ठिणगी विझू लागतेय की काय ही तिला भिती...
मित्रमैत्रीणी कुणीही उरलं नाही...
बोलायला समविचारी, समवयस्क कुणीही नाही...
आर्थिक परिस्थिती बेतासबात...
नौकरी करते म्हणाली...
तो नको म्हणाला...
मुलाकडे कोण बघणार?
ते वाया जातील, वाईट संस्कार होतील...
तिला पटले...न पटले...ती घरातच राहिली...
पैसा पुरेनासा झाला...
ती मग घरातल्या घरातच काहीबाही उद्योग करू लागली.
ती घरातल्या घरातच मुलं सांभाळू लागली.
स्वतःच्या मुलाची आई होतीच आता शेजारपाजारच्या मुलांचीही दाई झाली.
त्याने विरोध केला...
पण चार पैसे हाती ठेवताच त्याचा विरोध मावळला...
तिला त्यातच खूप आनंद झाला...
तिच्या अस्तित्वाची जाणिव झाली...
त्याने नंतर तिला बँकेत अकाऊंट उघडून दिले.
ते स्वतःच्या नावाचं एटीएम कार्ड, पासबूक पाहून तीचा आनंद गगनात मावेना.
आता चार गरजा भागू लागल्या. फार नाही पण मिठमिरचीसाठी का होईना तीचा पैसा कामी येऊ लागला.
छान निटनेटकेपणाची आवड असलेली ती इस्त्रीला पैसे लागतात म्हणून ती कधीच स्वतःचे कपडे इस्त्री करत नाही.
तेवढीच बचत....
घालायचे...धुवायचे...नीट घडी करून ठेवून परत घालावयाचे...
तो ट्रेन प्रवास त्रासदायक होतो म्हणून घरात चिडचिड करू लागला...
तिने त्याला जमवलेल्या पैशातून दुचाकी घेऊन दिली.
ती पार्लरवाली खूप पैसे घेतात. ते पैसे घरखर्चाला उपयोगी पडतील म्हणून क्वचितच वर्षातून एखादेवेळीच पार्लरमध्ये जात असे. मी घरातच तर असते. कोण बघतंय मला...अन् आहे तशी मी छान आहे असे म्हणून टाळायची.
पुढे पुढे तो मानेला मुंग्या येतात म्हणून तक्रार करू लागला.
तिला वाटले स्पाँडेलिसीस असला तर?
कसं करावं? लगेच डाॅक्टर कडे घेऊन गेली. डाॅक्टर ने औषधी दिली. बरं वाटलं तात्पूरतं. पण परत तेच...
ती परत म्हणाली, "तूझी नौकरी, तब्येत महत्वाची. पैसे काय चाटायचेत? तूला काही झालं तर मी काय करू ?"
तीने त्याला लगेच चार चाकी घेण्यास पैसे दिले.
तो आता चारचाकीत जातो.
ती तिथेच तशीच घरात...
नाही म्हणायला तो कधीतरी गाडीत बसवून बाजारात घेऊन जातो.
त्याला जरा सर्दी झाली, दात दूखला की तो घर डोक्यावर घेणार...
तिच्याकडून सगळे करून घेणार...
तिला काहीही होत नाही हेच त्याला वाटतं...
झालं जरी काही तरी डाॅक्टरकडे नेलं की त्याचं कर्तव्य संपतं.
तो फारसा बोलत नाही घरी...
तिची बौध्दिक भूक फार...
पण त्याला क्रिकेटपलीकडचे जग माहित नाहीच.
तिला वाटतं कुणाशी तरी चालू घडामोडींवर चर्चा करावी.
पण तो थकून येतो.
घरी आला की जेवतो अन् झोपतो लगेच.
तिला काळा रंग फारच आवडतो.
काळी गाडी घे तर तो नको म्हणाला.
त्याने तांबडी घेतली.
गेल्या कित्येक वर्षांपासून तिला संक्रांतीला काळी चंद्रकला हवी आहे.
पण तो म्हणतो," तू कुठे साड्या नेसतेस?"
दर संक्रांत अशीच काळी चंद्रकला मनीमानसी लेऊन ती स्वप्नातच खुश होते.
काल तो कौतुकाने म्हणाला, "कित्ती हौस असते नं बायकांना.
आमच्या ऑफिसातील सर्व जणी छान काळ्या साड्या घालून येणार आहेत. नटूनथटून येणार आहेत.
धमाल येणार आज. "
कित्ती सहज तो असं बोलला.
तिलाही मन भावना आवड निवड आहे हे तो विसरूनच गेलाय बहुतेक.
ती जिवंत आहे की मेलेली?
ती उभी आहे.
काम करतेय म्हणजेच तिला काहीही झालेले नाही.
ती साधी घरगुती असल्याने तिला गरजा मुळीच नाहीत
हाच त्याचा समज झालाय. ती बोलून दाखवते.
तरीही त्याचे लेखी तिच्या शब्दांना किंमत नाही.
तो शांत बसतो. ऐकतो. कामावर निघून जातो.
ती आपली एवढ्या वर्षात आहे तिथेच आहे...
अगदी तिथेच...
***मनिषा***
राधे __/|\__ कृष्ण
कैलास मांडगे ~~~~~~
कैलास मांडगे ~~~~~~
No comments:
Post a Comment