:::
बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज :::
छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे. जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल. अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्, ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते, नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही.
शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या . देशातले पहीले ‘खडे सैन्य’ त्यांनी उभे केले. त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल,जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद सैनिकांना,अधिकार्यांना पगार सुरु केले. शेतकर्यांच शोषण करणारी जमिनदारी पध्दत बंद करुन शेतकर्यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली.
शिवाजी महाराज ‘रयतेचा जाणता राजा’ होते हे खरच.शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराज लिहितात, ’कोण्हीकुणब्याचे येथील दाणे आणील्,कोण्ही भाकर्,कोण्ही गवत्,कोण्ही फाटे,कोण्ही भाजी, कोण्ही पाले.ऐसे करु लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरुन जीवमात्र घेउन राहीले आहेत तेही जाउं लागतील.कितेक उपाशी मराया लागतील.म्हणजे ऐसे होईल की ,मोगल मुलकात आहे त्याहुन अधिक तळतळाट
होईल.
तेंव्हा रयतेची सारी बदनामी तुम्हावर येईल.हे
तुम्ही बरे जाणोन बहुत यादी धरुन
वर्तणुक करणे.कोण्ही.... रयतेस काडीचा आजार द्यावयास गरज नाही. ज्याला जे पाहीजे,दाणा हो अगर गवत हो,अगर फाटे,भाजीपाले व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे.बाजारात जावे रास विकत
आणावे.कोण्हावरही जुलुम अगर कोण्हासी कलागती कराया गरज नाही...’ यावरुनच शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना याची महाराजांना काळजी
होती .वरील पत्राच्या उपदेशाच्या बरोबर विरुध्द वर्तन आजचे राजकारणी
करतात. जनतेचा पैसा,साधनसामग्री आपलीच आहे या थाटात आजचे राजकारणी आहेत.इतकेच काय
तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठीकाणी असलेल्या जमिनीही हे
राजकारणी लोक बळकावतात.
जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका सांगणारे महाराज कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देठाला सोडुन बाकी सर्वावर आपलाच
हक्क आहे या थाटात वावरणारे आजचे नेते कुठे... पण आपल्या प्रत्येक सभेच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला हे लोक न चुकता हार घालतात !शिवाजी महाराज निःस्वार्थी होते. ""एखाद्या गावच्या पाणवठ्यावरचे पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका, अन्यथा रयत म्हणेल, की मुघलच बरे. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा अन्यथा एखादा उंदीर पेटती वात तोंडात धरून धावत सुटेल आणि ती वात कडब्याच्या गंजीला लागून गंजी जळून खाक होईल, मग पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणार नाही. तेलवातीचे दिवे विझवून झोपा,'' अशी शिवरायांनी प्रजेची काळजी घेतली.
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालादेखील हात लावू नका, अशा सूचना शिवरायांनी दिल्या. आज मात्र शेतकऱ्यांच्या भाजीचे देठच काय "शेतकरीच' जिवंत ठेवायचा नाही, असे क्रूर राजकारण शिजत आहे. शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचा पुरवठा केला. ओसाड जमिनी ओलिताखाली आणल्या. वतनदारी-मिरासदारी बंद केली. पाणवठे, धरणे, तलाव बांधले. दुष्काळग्रस्तांना मदत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर शिवरायांचे हे कृषिधोरण अवलंबावे लागेल.
एखाद्या भागातुन
सैन्य जात असताना शेतापासुन दुरवरुन न्यावे कारण शेतांमधुन नेल्यास शेताची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्याने
जगायचे कसे याचाही विचार महाराजांचा होता. राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता.व्यापार राज्यासाठी खुप महत्वाचा आहे हे
महाराज जाणुन होते.’ रयत हे तो राज्याचे भुषण’ असे महाराज म्हणत. आजच्या,२१व्या शतकाच्या जागतिकीकरणाच्याकाळातही हे वाक्य फार महत्वाचे आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात जर आपल्या
राज्यकर्त्यांनाया वाक्याचा विसर पडला नसता तर आज कदाचित भारत हे विकसित राष्ट्र असते. आपल्या काळाच्या भरपुर पुढे
पहाण्याची महाराजांची दुरदृष्टी हे महाराजांच्या यशाचे फार मोठे रहस्य
आहे.महाराजांनी जलदुर्ग बांधले
कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटीश्,पौर्तुगिज्,फ्रेंच यांचा मुळ हेतु काय आहे हे महाराज जाणुन असावेत. आणि त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठी महाराजांनी
जलदुर्ग उभारले ,नौदल उभे केले.
महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांचा तुकाराम महाराज्, मौनी बाबा व इतर अनेक संतमहात्म्यांशीसंबंध आला. महाराजांनी त्यांना सढळ हस्ते मदत केली.महाराजांची तुळजाभवानीवरील निस्सिम भक्ती तर आपण जाणतोच. स्वराज्यनिर्मिती करण्याची शपथही महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने घेतली. ‘हे राज्य व्हावे ही तों श्रींचीच इच्छा आहे’ असेही महाराज म्हणत. पण धार्मिक असुनही महाराज अंधश्रध्दाळु नव्हते. महाराजांनी सिंधुबंदीची प्रथा मोडुन काढली. ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती.अजुन एक उदाहरण म्हणजे राजाराम हा महाराजांचा पुत्र पालथा जन्मला तेंव्हा महाराज म्हणाले होते ‘मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल.
शिवाजीराजे प्रयत्नवादी होते; निराशावादी नव्हते. शिवचरित्रातून आज आपण प्रयत्नवाद शिकला पाहिजे. शिवाजीमहाराज निर्व्यसनी होते. त्यांचे सर्व मावळेही (सैनिक) निर्व्यसनी होते. त्यामुळेच शिवाजीराजे यशस्वी झाले. व्यसनाधीन लोक कधीच क्रांती करू शकत नाहीत. शिवरायांच्या जीवनचरित्रातून निर्व्यसनीपणा तरुणांनी शिकावा.
शिवाजीराजे चारित्र्यसंपन्न होते. "शत्रूंच्या स्त्रियांचादेखील त्यांनी आई-बहिणीप्रमाणे आदर केला. ""ज्याला यश पाहिजे त्याने स्त्रीअभिलाषा धरू नये. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे!'' असे उद्गार शिवरायांनी वेळोवेळी काढले. हिरकणीच्या निर्भीडपणाचा, साहसाचा आणि मातृप्रेमाचा सन्मान करताना शिवाजीमहाराज म्हणाले होते, ""ताई, सर्व संकटांवर मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत स्वराज्यात आहे, तोपर्यंत ते कोणालाही जिंकता येणार नाही.'' आपली आई राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला. आज आपण २१ व्या शतकाची भाषा बोलतो. खरेच, आज स्त्री स्वतंत्र आणि सुरक्षित आहे?
शिवरायांच्याकडे आप-पर भाव नव्हता. नागनाथ महाराला महाराजांनी पाटील केले. रामोशी समाजातील बहिर्जीला गुप्तहेर खात्याचे प्रमुख केले. हंबीरराव मोहिते यांना सरसेनापती केले. जिवाजी महाले या नाभिकाला अंगरक्षक केले. माळी, धनगर, मातंग, महार, कोळी, आग्री, शेणवी, मुसलमान या सर्वांना शिवरायांनी हक्क-अधिकार दिले. आज जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे राजकारण झाले आहे. अशा काळात शिवरायांच्या चरित्रातून "समता' शिकावी.
युध्दनिती,कुटनितीमध्ये तर महाराजांचा हात पकडण त्या काळात कुणालाही शक्य नव्हत. एक परदेशी इतिहासकार म्हणतो ‘कुटनितीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितक होतं तितक औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हत.’आदिलशहाच्या तावडीतुन शहाजी राजांच्या सुटकेसाठी केलेले राजकारण्,जयसिंघाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देउन २१ ऐवजी प्रत्यक्षात १७च किल्ले देण्याचे राजकारण्,अफजलखानाला मैदानी प्रदेश सोडुन दुर्गम्, जंगली,पर्वती प्रदेशात आणन्यासाठी केलेली कुटनिती,आग्र्याहुन सुटका करवुन घेण्यासाठी आजारी पडण्याचे केलेले नाटक्,औरंगजेबाने जिझिया कर लागु केल्यावर ‘तुमच्यावर इतके दारीद्र्य आले आहे का?’ असे म्हणुन त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या कुशल बुध्दिमत्तेची ओळख करुन देणारी काही उदाहरणे! शिवाजीराजांचे सहा भाषांवर प्रभुत्व होते. जगाच्या स्पर्धेत टिकावयाचे असेल तर बहुभाषक असावे, ही प्रेरणा शिवचरित्रातून मिळते. कोणतीही अनुकूलता नसताना शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण केले. शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी गाव सोडले. त्यामुळेच ते कोकण, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, जिंजी जिंकू शकले. रेल्वे, विमान, हेलिकॉप्टर, मोबाईल, इंटरनेट, ध्वनिक्षेपक इत्यादी अत्याधुनिक साधने नसताना शिवरायांनी अश्यक्य कार्य शक्य केले.
अफजलखान आल्यानंतर शिवाजीमहाराज काही अनुष्ठानाला बसले नाहीत किंवा वारीला, कुंभमेळ्याला किंवा नारायण नागबळी करायला गेले नाहीत, तर "यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावे लागते, चातुर्य पणाला लावावे लागते,' हे महाराजांनी ओळखले होते. शिवरायांकडून आज वैज्ञानिक दृष्टिकोन शिकावा. शिवाजीराजांची लढाई आदिलशहा, मुघल, सिद्दी, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध होती; पण ती राजकीय लढाई होती. धार्मिक लढाई नव्हती. याउलट शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के सैन्य मुस्लिमांचे होते. त्यांच्या २७ अंगरक्षकांपैकी १० अंगरक्षक मुस्लिम होते. त्यांचे पहिले चित्र रेखाटणारा मीर महंमद हा मुस्लिमच होता. आरमारदलाचे प्रमुख दर्या सारंग व दौलतखान हे मुस्लिमच होते. असे असंख्य मुस्लिम शिवरायांकडे होते. म्हणजे शिवाजीमहाराज धर्मनिरपेक्ष म्हणजेच समता, मानवतावादी होते. शिवचरित्रातून मानवतावाद शिकता येतो.
शिवाजी महाराजांची रहाणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती. स्त्रीयांचा, परधर्माचा, परधर्मग्रंथाचा,परधर्मस्थळांचा आदर ही त्याचीच उदाहरणे. पण त्याचबरोबर स्वधर्म्, स्वजन्, स्वभाषा यांच्याबद्दल सार्थ अभिमानही त्यांना होता.आपल्या धर्माच्या लोकांचे ,आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी महाराजांनी केल्या.छत्रसालच्या राजाला त्यांनी त्याच हेतुने मदत केली, त्याचबरोबर गोव्यामधे सक्तीने धर्मांतर करवणार्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनाही महाराजांनी खंबीरपणे रोखले.
शिवाजीराजांनी झाडांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. "झाडे सर्वथा न तोडावी. लाकूड-फाटा हवा असेल तर जीर्ण झाड तोडा; पण त्या ठिकाणी नवीन झाड लावा. विनामोबदला शेतकऱ्यांकडून काही घेऊ नका. सागाची, आंब्याची, फळांची झाडे न तोडावीत,' असे आवाहन शिवरायांनी केले होते. आज पर्यावरण धोक्यात आले आहे. जागतिक तापमानवाढ हा जगापुढचा गंभीर प्रश्न आहे. सजीवसृष्टीचे म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण करावयाचे असेल तर शिवरायांच्या पर्यावरणदृष्टीची अंमलबजावणी करावी लागेल.
आजही सुरक्षादलांनी महाराजांकडुन खुप काही शिकण्यासारखे आहे.महाराजांनी स्वतःची ताकद ओळखुन ‘गनिमी काव्या’चा योग्य वापर करुन साम्राज्य उभारले.भावनेच्या भरात जाउन आमने-सामने युध्द न करता शत्रु बेसावध असताना त्याच्यावर छापा टाकुन शत्रूची दाणादाण उडवण्याचे तंत्र अवलंबले.महाराजांचे हेरखाते अतिशय सक्षम होते.आजच्या आपल्या देशात हेरखाते अस्तित्वात आहे का नाही असा प्रश्न कधीकधी उभा रहातो.आपन आपल्या शत्रुला बेसावध कधीच गाठु शकत नाही उलट शत्रुच आपल्याला बेसावध गाठुनवेचुन वेचुन मारतो हे दंतेवाडा,२६/११ वरुन दिसुन येते.शिवाजी महाराजांचे आपल्या शत्रुवर नेहमी लक्ष असायचे. गाफील रहाणे तिथे चालत नसे.म्हणुनच शिवाजी महाराज एकाच वेळी विविध आघाड्यांवर लढत मुघल,आदिलशाही,ब्रिटीश्,पौर्तुगिज इत्यादींशी महाराज एकाच वेळी सामना करत.पण आजच्या परीस्थितीत भारत याबाबत कमालीचा गाफील दिसतो.आपला शत्रु चीन आपल्याला घेरण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतो आहे. त्यांच्या राजधानीपासुन आपल्या सीमेपर्यंत लवकरात लवकर सैन्य घेउन येण्यासाठी महामार्ग बांधतो आहे.त्याचबरोबर आपल्या भागात घुसखोरी पण करतो आहे तरीही आपल्याकडे याबाबत फारच उदासीनता आहे.आपले सैन्य ‘जो सर्वात उचापती करणारा शेजारी आहे(पाकीस्तान) त्याच्याविरुध्दजिंकण्याची आपली क्षमता असली पाहिजे’ या थिअरीनुसार चालतो असे दिसुन येते.म्हणुनच चीनसारख्या देशाकडे दुर्लक्ष केले जाते. महाराज अशा विचारसरणिचे नव्हते असे वाटते.कारण तसे असते तर मुघल हे सर्वात महत्वाचे शत्रु होते आणि त्यांच्याकडे नौसेनाही नव्हती तरीही महाराजांनी नौसेना ,जलदुर्ग,उभारले.थोडक्यात म्हणजे आपले जे कोणी शत्रु विविध आघाड्यांवर आहेत त्यांच्याविरुध्द जिंकण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याची महाराजांची पध्दत होती.
तर अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहीजे. पण एव्हढ्यावरच थांबुन उपयोग नाही.फक्त भावना,फक्त जयजयकार, फक्त मिरवणुका पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज्,आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहीजे. आपली शिवभक्ती फक्त भावना भडकवल्यावरच जागी होता कामा नये. शिवभक्ती आपल्या रक्ताचा भाग बनल्यावर भ्रष्टाचार्, नीतीमुल्यांचे हनन आपोआपच थांबेल. शिवरायांच्या ठायी असलेली चिकाटी जर आपण आपापल्या क्षेत्रात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल.
स्वाभिमानाच्या सूर्याला, पर्वतासारख्या खंबीर राजाला, जिजाऊच्या सिंहाला आणि त्याच्या कर्तुत्वाला..... समस्त भारताचा मानाचा मुजरा...!!!
राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो...
जय शिवराय...
जय शंभुराजे...
जय भारत !!
मला हा लेख अतिशय आवडला ... आणि विशेष म्हणजे २ वर्षापूर्वी माझ्या फेसबुक वरील माझे स्नेहीपैकी च मला पाठविला. त्या स्नेहींचे नाव मी विसरलो म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो . लेखक जे ही असतील त्यांचे देखील अत्यंत आभार ..... कारण छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्रा चे दैवत आमची प्रेरणा ज्या पद्धतीने आणि सर्वांग सुंदरतेने ह्या लेखात प्रसंग आणि व्यक्ती रेखा मांडल्यात त्या मला अतिशय भाव्ल्यात ... छायाचित्र गुगलबाबांच्या मदतीने ..आणि ते सर्व वाचकांपर्यंत पोहोचवाव्यात हाच या मागे सद्हेतू .........
राधे __/|\__कृष्ण
!! श्री स्वामी समर्थ !!
कैलास मांडगे ..........
No comments:
Post a Comment