Tuesday, September 16, 2014

ठेविले अनंते तैसेची राहावे


:@:  ठेविले अनंते तैसेची राहावे  :@:

मनोगत --  मंदाकिनी रासकर


ठेविले अनंते तैसेची राहावे .
 खरंच हि वाटते एकच ओळ , पण यात किती मोठा भाव दडला आहे ना ?
 काही लोकं रंगाला , रुपाला किती नको तेवढे महत्व देतात .
 पण त्या व्यक्ती मध्ये काही गुण आहेत कि नाहीत हे कुणी पाहते कां कधी ?
 आपल्याला जन्म घेताना जर आपल्या मनाप्रमाणे जर रंग आणि रूप निवडता आले असते तर ? तर साहजिकच प्रत्येकाने सुंदरच रूप निवडले असते .पण असे नाही घडत . जे आपल्या नशिबात असेल आणि जितके असेल तितकेच आपल्याला मिळते .

मी लहान असतांना मला अजूनही आठवते माझ्या घरात मीच फक्त काळी , जाड , आणि नाकाने नकटी होते . माझ्या माहेरी सगळे दिसायला सुंदर आणि गोरेपान त्यात मीच फक्त अशी वेगळी होते . आम्ही कुठेही कार्यक्रमाला एखाद्या गेलो कि लगेच सगळे विचारायचे हि तुमचीच मुलगी कां ? किंवा माझ्या बहिणीना म्हणायचे हि तुमची सख्खी बहीण कां ? मग हो असे उत्तर आले , कि लगेच बायका म्हणायच्या वाटत नाही पण !! हि खुपच वेगळी आहे दिसायला !! मला हा भेदभाव पाहून माझ्या बालमनाला राग येणे साहजिकच होते . हळूहळू मला असं वाटायचं कि कुठे जायलाच नको आपण . म्हणजे कुणी काही विचारणारच नाही असं . मला तेंव्हा ती जुन्या गीताची एक ओळ आठवायची ,
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ,
 होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक .
 पण मी मग हा विचार करणे कालांतराने हळूहळू सोडून दिले . मनांत विचार केला कि , काहीही झालं तरी आता आपल्यात बदल तर होणार नाहीच ना ? आपण जसे आहोत तसेच दिसणार ना ? मग कां रडत आणि कुढत बसायचे उगीच ? जग आणि लोकं गेली उडत तिकडच !!
 आपल्याला आयुष्य जगायचंय आपलं आणि तेही हसत हसत आनंदाने भरभरून अगदी !!
मग कां विचार करायचा कुणाचा ? मला आताही जर एखाद्या व्यक्तीला रंगारूपा साठी कुणी काही बोलले कि खुप राग येतो आणि वाईटही वाटते . त्या व्यक्तीत मला मी दिसते . आणि मी विचार करते कि , काय असुरी समाधान  मिळत असेल बरं लोकांना इतरांना हिणवण्यात किंवा कमी लेखण्यात ? अरे तुम्ही आधी तुमचे रूप पहाना मग इतरांना पहा !! मी नेहमी असा विचार करते कि , निदान आपल्याला नशिबाने सर्व सदृढ शरीर तरी मिळाले आहे . पण काहींच्या नशिबात तर तेही नसते . काहींना हात नाही तर काहींना पाय नाही . काहींना दृष्टी नाही तर काहींना बोलता किंवा ऐकता येत नाही . काहींचे दुर्दैव असे की ते जन्माला येतानाच अपंगत्व घेऊन येतात . त्यांनी तर काय अपराध केला होता की त्यांना आयुष्यभर अपंगत्व झेलावे लागून जीवनात आनंदी रहायचे .

आपण नेहमी अशा व्यक्तींना पाहून ईश्वराचे आभार मानावेत कि मला तू परिपूर्ण बनवलेस . आणि या ऋणातून जर मुक्त व्हावे असे वाटत असेल तर सर्वांनी मरणोत्तर देहदान देखील अवश्य करावे . असेही मृत्यू नंतर आपले शरीर नष्टच होणार असते . ते जर सत्कारणी लागले तर त्यासारखे दुसरे पुण्य नाही .
 काय वाटते नक्कीच आपण सर्वांनी याचा जरूर एकदा तरी विचार केला तर एक वेगळी अनुभूती जाववेल की 
आयुष्य किती सुंदर आणि मोहक आहे
. धन्यवाद .

 मंदाकिनी रासकर .    

राधे __/|\__कृष्ण

!! श्री स्वामी समर्थ !!

No comments: