:-:-: जीवन एक कमाल धमाल आहे :-:-:
श्री. नवनाथ पवार
औरंगाबाद
जीवन
एक कमाल धमाल आहे.. स्थूल रुपात जे जालीम विषच असते ... तेच सूक्ष्म रुपात
प्राणशक्तीला सुदृढ बनवणारे गुणकारी औषध असू शकते... कडू धोत्र्यापासून
स्ट्रॅमोनियम नावाचे औषध बनते... नागाच्या विषापासून नाजा... सर्पविषापासून
लॅकेसीस ... अर्सेनिक पासून अर्सेनिकम ... अशा अनेक रोगविषापासून प्रतिबंधक लसी
बनतात ...
मग
क्षणभर मनात विचार येतो माझ्या मनातल्या विषापासून असे एखादे औषध बनेल का ? आहे ना वेडगळ कल्पना ? पण मनात आले ते सांगून टाकले..
! नाही म्हणजे मनातले विषही कमी होईल आणि ते वाया गेले हि बोचही राहणार नाही ...!!
आणि
एक ओझरत्या विषदंताचा वण आहे माझ्याही मनावर .... खूप सूक्ष्म मात्रेतल्या त्या
विषाने आजवर मला मारले नाही म्हणजे आता त्याचेही असेच प्राणशक्तीला धारण करणारे
औषध बनले असावे का रक्तात ? माहित
नाही ... खरे म्हणजे मला काही म्हणता काहीच समजत नाही ..... फक्त एखाद्या पहाटे
झोप आणि जागेपणाच्या सीमारेषेवर असताना .... आधी जाणवते एका विषदंताची विलक्षण
वेदना ... काही क्षण एक धुंद बेहोष ग्लानी ... आणि मग खूप दुरून हळुवारपणे एक नाद
ऐकू येऊ लागतो ... सूक्ष्म ... अतिसूक्ष्म ... इतका कि जवळून जाणाऱ्या मुंगीच्या
पावलांनीही तो पुसला जातो निमिषभर ... पण त्याची लय वाढत जाते.. सप्तके बदलतात ...
अजून काय काय होते माहित नाही ...पण जाणीव नेणिवेच्या सीमारेषेवर पुन्हा एक धुंद
बेहोशी ... पण यावेळी ती जागृतीकडे नेणारी ... कोणीतरी आपल्या निळ्याशार नजरेने
हळूवार स्पर्श करत मला जागे करत जाते... स्वर जाणवतात पण दिसत नाही... स्पर्श
जाणवतो पण ऐकू येत नाही ... रोमरोमातून एक अनाहत नाद ... जणू सरस्वतीची वीणा
झंकारत असावी ...
या
कुदेंदूतुषार हार धवला ... या शूभ्रवस्त्रावृता
असेच
काहीतरी ओझरते झंकारते त्या वीणानादातून ... पण हे काय आता नाद पुन्हा बदलतोय ...
वीणानाद की वेणुनाद ... काहीच समजत नाही... ! समजते ते इतकेच की ... आता डोळे
उघडताच मला काहीतरी अनुपम सौंदर्य दिसणार आहे... ! हळूच कोणीतरी पापण्यांना
उघडायची इच्छा देते ... अन मन म्हणते ... आज तर जिथे जिथे नजर पडेल तिथे सौंदर्य
आणि फक्त सौंदर्य दिसेल... !
बस
आता टक्क जाग येते ... जवळून आपल्या इवल्याशा जबड्यात एक अन्नकण घेऊन जाणारी मुंगी
दिसते... मला राहवत नाही...ह्यालो मुंगीताई .. कशी काय बरी आहेस ना ? नाही म्हणजे सांगायला
हरकत नाही पण तू आज खूपच सुंदर दिसतेस ... बाहेर अंगणात एक चीऊ मातीत पंखांची थरथर
मिसळून धूळस्नान करत असते... मी तिलाही आय लव्ह यु म्हणून कौतुक करतो ... विजेच्या
तारेवर आपल्याच पंखात चोच खुपसून खुपसून सफाई करणाऱ्या कावळ्याला पण .. गुड
मॉर्निंग म्हणून मी विश करतो .. अन माझ्याकडे संशयाने पहात तो आभाळात झेपावतो ...
आपल्याच मस्तीत शिस्तीत उडणारी बगळ्यांची माळही आज माझ्या विशच्या टप्प्यात
असते... पहाटेचा संधिप्रकाश उजळताना मी आता ठार वेड्या सारखा हसत गुणगुणत असतो ...
कुठेही बोटाने काहीतरी अगम्य लिपीत काहीतरी गिरवत जातो ... भिंतीवर ... हवेत ...
आरशाच्या धुळीवर ... कागदाच्या चिठोर्यावर .... मी अदृश्य घाटदार वेलांट्या गिरवत
जातो..
हळूहळू
उन्हं तापू लागतात ... मनातल्या विश पुन्हा विषारी होऊ लागतात ... संध्याकाळी सगळे
अंगांग विषारी धुळीने माखलेले .... चहा घेता का विचारणाऱ्या आवाजावर आता मी
केवढ्याने तरी खेकसतो .....
माहित
नाही तुला ...? मला
चहा शब्दाचीसुद्धा किती घृणा आहे ! का विचारतेस रोज दोन वेळा दावेदारणी सारखी ?
....
मग
काही खातोस ... ?
काय
खाऊ घालशील ?... जहर ?
तिच्यावर
माझ्या कुठल्याच विखारी शब्दाचा असर होत नाही... आणि हाच माझा मोठा अपमान असतो ...
माझे जहर इतके निष्प्रभ कसे झाले दिवसभरात ? का दिसत नाही काहीच असर ...
म्हणजे मी दिवसभरात ओकत गेलो तेही असेच वाया गेले असेल... ?
माझा
विषारी अहंकार दुखावतो पण काही हालचाल करता येईल अशा अवस्थेत नसतोच उरलेला .....
त्याला पहायचे असते सारे जग पेटलेले ... अन सकाळची मुंगी पुन्हा दिसते तितक्याच
लगबगीने जाताना ... पण मला धुमसताना पाहून थबकते क्षणभर ... हाय पिल्ला गुड इवनिंग
... आता मात्र माझ्या संतापाचा बांध फुटतो ... साली ...साध्या खसखशीच्या
दाण्याइतकीही जाड नाही... अन म्हणे मी पिल्लू ...! मी उपहासाने हसून तिला बाय
करतो... तर अंगणातली चिमणी पण चिव चिव करत म्हणते कशी ...
..... हाय रे ..! काय सॉलिड दिसतोयस आज ...! एकदम स्मार्ट ...!! मी हातात
येईल ते तिला फेकून मारतो ... आणि ती माझा नेम चुकवून भुर्रकन उडून तारेवर जाऊन
बसते... अन पुन्हा तो कावळा माझ्याकडे एकाक्ष नजरेने पहात, तिच्याकडे दुसरा डोळा
मिचकावून मला म्हणतो .... हाय दादा .. इतका काळा ठिक्कर कसा पडलास ? माझा पिअर्स साबण देऊ
का पाठवून ?
आता
मी इतका भडकतो कि सांगता सोय नाही...अभद्र ... काळचोच्या .. साल्या ...! हजारो
वर्षात इतकाही सुसंस्कृतपणा आला नाही तुम्हा कावळ्याच्या जातीत ...! पुन्हा दिसेल
ते हाती घेऊन त्याच्यावर भिरकावतो ... तो नेम चुकवत इकडून तिकडे उडत राहतो ... मीच
मग घामाघूम होऊन चडफडत खाली बसतो ... कोणाला काहीच फरक पडत नाहीय माझ्या चिडण्याने
!
....आता त्राणच उरलेले नसते माझ्या विषात ... पण मी चिडत नाही... आता
मनात फक्त मंद हसू फुटू लागते... पुन्हा एक काळोख चहूबाजूंनी मला आपल्या बाहूत
कवटाळतो ... कोण म्हणते काळोख अशुभ असतो ? ....पापण्या मिटतात ... हळूच एक
बेहोशी रोमरोमातून उगवते ... एक सूक्ष्म कंपन हवेच्या अनुरेणुतून झंकारत जाऊ
लागते... पुन्हा मी जागृती आणि झोपेचा झुल्यावर ... वेणुनाद कि वीणानाद ...... अन
एक अदृश्य चुंबन कपाळावर ... पापण्यावर ... ओठावर ... खोल जाणीवेतून .. नेणीवेत
जाताजाता ... विषदंताची खुण आता .. जाणवत नाही... काय होणार असते माझे ... कुणास
ठाऊक ? ...न...
https://www.facebook.com/
श्री. नवनाथ पवार
· ( All religions ultimatly shall for human beings, in present
world.
Anything committing after death, isabsolutely ignored by me.
I only
believe in nature and its rules. Any contradiction with religion,
I will adhere
to nature and humanity than god.)
राधे __/|\__कृष्ण
No comments:
Post a Comment